Politics News : मोठी बातमी! भाजपचा बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग…

Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
संजयकाका पाटील यांनी अचानक पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरु झाले असून, त्यांच्या भाजप गटात राहण्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. संजयकाका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
मात्र, नुकत्याच पार झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. Politics News
दरम्यान, संजयकाका पाटील यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट केले की, त्यांनी शरद पवार यांची भेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली आहे. मी भाजपात समाधानी आहे आणि तुतारी हातात घेणार नाही. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
त्यांच्या भेटीनंतर अनेक लोकांनी त्यांना फोन करून या भेटीवर प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सत्तासमीकरणांत होत असलेल्या बदलांचा आढावा घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुका किती महत्त्वाच्या ठरतील हे लक्षात घेतल्यास, या भेटीला राजकीय संकेत मानले जात आहेत. आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.