राजकारणात खळबळ ; विधानसभेच्या 160 जागा जिंकून देण्याची दोघांनी दिली होती गॅरंटी, शरद पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सनसनाटी विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.विधानसभा निवडणुकीआधी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे दोन लोक आपल्याला दिल्लीमध्ये भेटायला आल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. मात्र आपण त्या दोघांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली. या मार्गाने जाऊ नये,जनतेचा निर्णय मान्य करू असं ठरल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.
नागपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवारांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले,मला आठवतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावं आणि पत्ते माझ्याकडे आता नाहीत. दोघांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं, निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यक्तिंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असताता पण दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर त्या लोकांनी आणि राहुल गांधी यांच्याशी भेट करून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झालं. हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान या दोघांची नावे पत्ते सध्या माझ्याकडे नाहीत असे सांगत त्यांनी पवित्रा साधला. शरद पवार यांच्या वक्तव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला आहे.