अमित शहांच्या पुणे दौऱ्याआधी राजकीय वातावरण तापलं! काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भाजपचं जशास तसं उत्तर


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसने दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा केली असून, भाजपनेही त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत अमित शहा यांच्या सुरक्षेचा आढावा, संभाव्य आंदोलने, संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

दरम्यान, पुणे महापालिकेनेही दौऱ्याच्या तयारीला वेग दिला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विमानतळ ते महर्षीनगर या मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डे बुजविणे, स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शुक्रवारी रात्री अमित शहा पुण्यात दाखल होणार असून त्यांचा ताफा महर्षीनगर आणि स्वारगेट परिसरातून जाण्याची शक्यता आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सारसबाग परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अमित शहा अभिवादन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सारसबाग, स्वारगेट आणि व्होल्गा चौक परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासह रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, व्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती सुरू केल्याने या निर्णयावरही विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!