पत्नीची फसवणूक करून पोलीस उपनिरीक्षकाने दोन लग्न उरकली, बायकोच्या तक्रारीनंतर सगळंच उघड झालं, आता सेवेतून निलंबित…

कोल्हापूर : स्वतःच्या पत्नीची फसवणूक करून आणखी दोन लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला काल (ता.१०) सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. इम्रान मुल्ला या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. ते शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
दरम्यान, त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस उपनिरीक्षकाचे पहिले लग्न झाले असताना ती माहिती लपवून बेकायदेशीर रित्या दुसरे लग्न केले. सातत्याने वाद होत असताना तिसरे लग्न केले. आता बायकोने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी मुल्ला याला निलंबित केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक असलेल्या इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी २०१९ च्या दरम्यान विवाह झाला होता. यावेळी इम्रान मुल्ला हे गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार आफरीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते.
शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१५ साली पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. मात्र कायदेशीर रित्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचे समोर आले.
पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी इतक्यावरच न थांबता २३ जून २०२४ रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली. आपल्यासोबत कायदेशीर रित्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतेही कारवाई होत नसल्याने अखेर माहिती अधिकारात यांनी पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला.
यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता, सुहाना कुमार यांच्याशी माझे लग्न झालेले नाही ती माझी मैत्रीण आहे. असा खुलासा त्यांनी केला होता. तर आफरीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान इम्रान मुल्ला यांनी दिली आहे. त्यामुळे तिसरे लग्न मी कायदेशीर रित्या केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर इम्रान मुल्ला याचे सुहाना कुमार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. शिवाय एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला याच्याशी लग्न झाल्याची कबुली देण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
दरम्यान, इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचे स्पष्ट करत काल इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.