उरुळीकांचन येथील प्रसिद्ध ‘कल्याण मटका’ अड्ड्यावर पोलिसांची धाड; रशी महारथी ताब्यात…

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या बाजार मैदान परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मटका बुक लिहून घेणाऱ्या मुख्य चालकांसह एकूण 10 जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले आहे.

आरोपींकडून मटक्याची स्लिप बुक्स, कार्बन आणि रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे मटका चालकांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी (ता. 05) सकाळी साडेअकरा वाजता बाजार मैदान येथील शहा यांचे बिल्डिंगचे पार्किंग मध्ये हि कारवाई करण्यात आली.
राजेंद्र केरु वाघमोडे (वय 57, रा. बोरीपार्धी, केडगाव, ता. दौंड) याच्या ताब्यातून आकडेमोड केलेले कागदाचे स्लिप बुक, निळा कार्बन आणि 1 हजार 310 रुपये रोख रक्कम तर अतुल अनिल टिळेकर (वय 30 ,रा. बाजार मैदान, उरुळीकांचन, ता. हवेली) याच्या ताब्यातून मटका स्लिप बुक आणि 420 रुपये रोख जप्त करण्यात आली. या कारवाईत मुख्य चालकांसोबतच मटका अड्ड्यावर जुगार खेळत असलेले मनोज अशोक कोऱ्हाळे (वय 32, रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन), राजेंद्र संभाजी वाघमारे (वय 60, रा. थेऊर, ता. हवेली), विजय रमेश जाधव (वय 34, रा. सटवाई चौक, उरुळी कांचन) गजानन अवधुत गेटे (वय 44, रा. शिंदवणे, ता. हवेली), धर्मा लक्ष्मण देढे (वय ४०, रा. इंदिरानगर, उरुळी कांचन), सोमनाथ अशोक बेलार (वय 42, रा. शिंदवणे, ता. हवेली), प्रभाकर विश्वनाथ सोनवणे (वय 54,रा. दिघी, जि. पुणे), गणेश शांताराम कांचन (वय 42, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई अक्षय कामठे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शासकीय वाहनातून हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करत होते. यादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, उरुळी कांचन गावच्या हद्दीत बाजार मैदान येथील ‘शहा’ यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये काही इसम कल्याण मटका नावाच्या जुगाराची साधने बाळगून लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने पार्किंगमध्ये पाहिले असता, तिथे दोन इसम हातामध्ये मटक्याची स्लिप बुक घेऊन उभे होते, तर त्यांच्या समोर 8 ते 9 जण मटक्याचे आकडे लावण्यासाठी गर्दी करून उभे होते. अचानक पोलिसांची एन्ट्री पाहताच जुगारांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत सर्वांना जागीच घेरून ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, राजेंद्र वाघमोडे व अतुल टिळेकर याच्या ताब्यातून मटका स्लिप बुक व रोख रक्कम जप्त करण्यात आली. मुख्य चालकांसोबतच मटका अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेल्या वरील 8 जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्याचा नवीन पदभार अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने, “हद्दीत जुगार, मटका आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांची यापुढे खैर नाही,” असा थेट संदेश पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खरात करत आहेत.