Maratha Reservation : मराठा समाजाने उधळली उध्दव ठाकरे दौऱ्याची नियोजन बैठक! कुठं घडला हा प्रकार घ्या जाणून..!!

(Maratha Reservation) मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आयोजित बैठक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना शासकीय विश्रामगृहात बैठक, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा निर्धार करत मराठा आंदोलकांनी ही सभा उधळून लावली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अजूनही ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी साखळी उपोषण अजूनही केले जात आहे. सोबतच, आज जालना येथील आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देखील जिल्ह्यातील काही मराठा आंदोलक हजर राहणार आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक असल्याचे दिसत आहे. तर, आंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीनंतर २४ तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. Maratha Reservation
दरम्यान, नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आलेला होता. त्या दौऱ्याच्या अनुषंगाने एका बैठकीचं आयोजन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. शनिवारी सांयकाळी ती बैठक उधळण्यात आली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणतीही बैठक किंवा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. ती बैठक उधळून लावली. यापूर्वी भाजपची बैठकदेखील अशीच उधळून लावली होती. राज्यात सर्वच मराठा आंदोलक राजकीय नेत्यांबाबत रोष व्यक्त करीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झालाय.