घरी दूध आणताय की भेसळयुक्त दूध? राज्यातील ७८ टक्के दूध पुणे विभागातून जप्त; FDA च्या कारवाईत धक्कादायक वास्तव समोर…

पुणे : राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत पुणे विभागातून समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात जप्त करण्यात आलेल्या एकूण दुधापैकी तब्बल ७८ टक्के दूध एकट्या पुणे विभागातून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे दूध भेसळीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सहा महिन्यांत १.५७ लाख लिटर दूध जप्त
एफडीए प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत पुणे विभागातील ८०५ आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान १ लाख ५७ हजार ९६५ लिटर भेसळयुक्त आणि संशयास्पद दूध जप्त करण्यात आले. या दुधाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६७ लाख रुपये आहे.


दूध भेसळ प्रकरणी पुणे विभागात ४७ जणांना अटक करण्यात आली असून, पाच गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय पनीर, खवा आणि बटर यांसारखे बनावट व भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थही जप्त करण्यात आले. या पदार्थांची किंमत सुमारे १ कोटी ७३ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
तपासणीतील १३ नमुने आरोग्यासाठी असुरक्षित
दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या १,२०१ नमुन्यांपैकी १४ नमुने निकृष्ट दर्जाचे, तर १३ नमुने मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरत आहे.
राज्यातील इतर विभागांत किती दूध जप्त?
गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात एकूण ३,१०९ ठिकाणी तपासणी व धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत एकूण २ लाख ३ हजार ६२२ लिटर दूध जप्त करण्यात आले, तर ६५ जणांना अटक करण्यात आली.
विभागनिहाय जप्त दुधाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
पुणे विभाग : १,५७,९६५ लिटर दूध जप्त; ४७ जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर : २२,०१६ लिटर दूध जप्त; ९ जणांना अटक
कोकण विभाग : १३,९४९ लिटर दूध जप्त; २ जणांना अटक
नाशिक विभाग : ६,०२३ लिटर दूध जप्त; ५ जणांना अटक
बृहन्मुंबई : ३,२४३ लिटर दूध जप्त; २ जणांना अटक
अमरावती विभाग : २७६ लिटर दूध जप्त; कोणालाही अटक नाही
नागपूर विभाग : १५० लिटर दूध जप्त; कोणालाही अटक नाही
या आकडेवारीनुसार, राज्यात जप्त करण्यात आलेल्या एकूण दुधापैकी सर्वाधिक दूध पुणे विभागातून जप्त झाले आहे. त्यामुळे या भागातील दूध भेसळीविरोधातील कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एफडीएकडून कठोर कारवाईचा इशारा
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांविरोधात यापुढेही कठोर मोहीम राबवण्यात येईल, तसेच दोषींविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तपासणी आणि कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
