Parth Pawar : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना आता व्हीआयपी सुरक्षा, नेमकं कारण काय?
Parth Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली .
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळेच त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हेदेखील पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यांना आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. Parth Pawar
कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पवार कुटुंबातील युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात आहेत. ते राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी गेल्यानंतर लोकांनी घेराव घातला होता.
अजित पवार यांच्या नावे चुकीचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, अशा दावा या लोकांनी केला होता. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार तसेच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.