पालकांनो उन्हात मुलांचा काळजी घ्या! ११ वर्षांच्या मुलाचा उष्माघातामुळे मृत्यूु, धक्कादायक माहिती आली समोर…

बुलढाणा : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पारा ४० पार गेला आहे.अशातच बुलडाण्यामध्ये उष्माघातामुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संस्कार सोनटक्के (वय. ११) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं ही घटना घडली आहे. शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये संस्कार सोनटक्के हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. संस्कारला उन्हाचा फटका बसला. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात होते. पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कारच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे.