पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ ; ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा जागीच मृत्यू…

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ड्रेनेज लाईन मध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड मधील निगडी परिसरात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याकडून केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं. एका ठिकाणी ड्रेनेज मध्ये केबल टाकण्यासाठी बीएसएनएलचे कर्मचारी उतरले. मात्र विषारी वायूमुळे तीन कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडला आणि तिथेच तिघांचा जागीच मृत्यू झाला. या तिन्ही कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिघांवर काळाने घाला घातला आहे. तिघांच्या मृत्यूने या कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
