‘जीव वाचवणाऱ्या’ डॉक्टरचाच काळा धंदा! माजी सिव्हिल सर्जनच्या हॉस्पिटलमधून २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपातांचा पर्दाफाश


कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या साखळीचा मोठा भांडाफोड झाला असून, या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे शासकीय सेवेत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) म्हणून कार्यरत राहिलेल्या निवृत्त डॉक्टरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्भलिंग चाचणीविरोधात कारवाई करणाऱ्या यंत्रणेचा भाग राहिलेल्या डॉक्टरनेच निवृत्तीनंतर अवैध गर्भपाताचे रॅकेट उभे केल्याचा आरोप समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

करवीर पोलिसांनी कळंबा परिसरातील गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास करताना कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर छापा टाकला. या कारवाईत डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड (वय ७०) याला ताब्यात घेण्यात आले. छाप्यात सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे.

प्राथमिक चौकशीत डॉ. गायकवाड यांनी गेल्या दीड वर्षांत २५० हून अधिक महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात हा प्रकार मागील चार वर्षांपासून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रत्येक गर्भपातासाठी संबंधित महिलांच्या आर्थिक परिस्थितीनुसार २० हजार ते ४० हजार रुपये आकारले जात असल्याचेही उघड झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा धागा कळंबा येथील थ्री स्टार लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटपर्यंत पोहोचला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला एजंट मनीषा दिनकर कांबळे आणि अश्विनी गजानन शिंदे यांच्या चौकशीतून डॉ. गायकवाड यांचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत प्रतिमा हॉस्पिटलवर धाड टाकली.

डॉ. गायकवाड हे सुमारे दहा वर्षांपूर्वी सिव्हिल सर्जन पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी कदमवाडी येथे खासगी रुग्णालय सुरू केले. मात्र, याच रुग्णालयातून अवैध गर्भपाताचे जाळे चालवले जात असल्याचा संशय आता बळावला आहे. तपास यंत्रणा रुग्णालयातील नोंदी, आर्थिक व्यवहार, वैद्यकीय कागदपत्रे तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची माहिती तपासत आहेत.

दरम्यान, पोलिस कारवाईची माहिती मिळाल्यानंतर डॉ. गायकवाड यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा रक्तदाब १८० तर रक्तातील साखरेची पातळी २९५ पर्यंत वाढल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

या प्रकरणामुळे कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून, गर्भलिंग चाचणी, बेकायदेशीर गर्भपात आणि त्यामागील दलालांचे जाळे किती मोठे आहे, याचा आता करवीर पोलीस सखोल तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर, एजंट किंवा आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!