‘एक बॉम्ब, दुसरा अणुबॉम्ब!’ मनोज जरांगेंचा इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई : त्या दिवशी ऐकवलेली ऑडिओ क्लिप काहीच नाही. माझ्याकडे आणखी एक बॉम्ब आहे. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब आहे. माझ्यावरचे आरोप होऊ द्या, त्यानंतर हे दोन्ही बॉम्ब फोडतो, असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जरांगे यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या या क्लिप नेमक्या कोणाच्या विरोधात आहेत आणि त्यातून कोणती माहिती समोर येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या क्लिपमधील कथित माहितीबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही.
‘माझी बदनामी करण्यासाठी टीम तयार’


मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांच्या लोकांनी आपल्याविरोधात बोलण्यासाठी अनेक टीम तयार केल्या असून, प्रत्येक जिल्ह्यात या टीम कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. या माध्यमातून आपली बदनामी केली जात असल्याचेही जरांगे म्हणाले.
“त्यांना आता बोलू द्या. मी त्यांना बरंच बोलू देणार आहे. नंतर एकदाच बॉम्ब काढतो. तुम्ही शिंदेंसाठी मला बदनाम करताय ना? मग बघा, मी काय काय बाहेर काढतो,” असा इशारा त्यांनी दिला.
‘हे पोरगं सोपं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं’
आपल्याविरोधातील कथित क्लिप आणि आरोपांच्या तपासाबाबतही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले. “या क्लिपच्या आरोपांचा ते शोध घेणार की नाही, हे कळत नाही. मी त्यांची यंत्रणा कमजोर केली आहे. हा आपल्या गुप्त यंत्रणेच्या पुढचा निघाला. तो आपल्या यंत्रणेचं कंबरडं मोडू शकतो, तर हे रसायन वेगळं आहे. हे पोरगं सोपं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे,” असं ते म्हणाले.
आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. मात्र, आपण अशा प्रयत्नांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांचं कौतुक; सरकारवरही निशाणा
यावेळी मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं. जरांगे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, राज ठाकरे हे विकासाचं व्हिजन मांडणारे आणि सत्य बोलणारे नेते आहेत.
“राज ठाकरे कोणतीही गोष्ट मनाला पटल्याशिवाय बोलत नाहीत. मी त्यांची काही भाषणं पाच-सहा वर्षांपूर्वी ऐकली आहेत. सत्य बोलून एखादी गोष्ट कशी करायची, हे सांगणारा हा माणूस आहे,” असं त्यांनी म्हटलं.
राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेचा उल्लेख करत जरांगे यांनी जनतेच्या मतदानाच्या निर्णयावरही भाष्य केलं. कथित षडयंत्र गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, भविष्यात आपल्याविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण त्याला प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
सुधीर मुनगंटीवारांच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जरांगे यांच्याबाबत बोलताना, “मनोज जरांगे कशाला ५०० कोटी घेतील? जरांगे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांना काही हवं असतं तर ते राजकारणातच आले असते,” असं म्हटलं होतं. या विधानावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.
“सुधीरभाऊ बोलले म्हणून मी बोलत नाही. मी यापूर्वीही बोललो आहे. सुधीरभाऊंनी पक्ष वाढवला. त्यांची अवस्था काय केली आहे? ते विधानसभेत पक्षाच्या विरोधातही बोलतात. त्यांच्या मनातील तळमळ महाराष्ट्र बघतो. ते सत्य सांगणारे नेते आहेत; पण आजच्या भाजपला ते पटत नाही,” असं जरांगे म्हणाले.
‘डाव टाकला तर दुसरा फासा टाकायला तयार’
या प्रकरणाच्या मुळाशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जातील, अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. मराठा समाजावर राजकीय डाव टाकला जाणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
“शिंदे आणि फडणवीस सर्वांचं ऐकून या प्रकरणाच्या मुळाशी जातील, असं मला वाटतं. ते मराठ्यांवर डाव टाकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. डाव टाकला तर मी दुसरा फासा टाकायला मोकळा आहे आणि पक्का आहे,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, जरांगे यांनी उल्लेख केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकी कोणती माहिती आहे आणि ते जाहीरपणे कोणते खुलासे करणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
