बाजार समितीच्या निमित्ताने हवेलीत सुरू झाली कोटींची उड्डाने ; मातब्बर उमेदवार बोलू लागले खर्चाची भाषा…!
जयदीप जाधव
उरुळी कांचन : पुणे – हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची तब्बल १९वर्षानंतर लोकनियुक्त संचालक मंडळाची निवडणूक अखेर सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्याने या निर्णयाने हवेली तालुक्यात राजकीय घडामोडींंनी वेग घेतला आहे. १९ वर्षाच्या प्रतिर्घ कालखंडात बाजार समितीची निवडणूक होत असल्याने या निवडणूकीच्या निमित्ताने तालुक्यात मोठा उत्साह संचारला असुन कार्यकर्ते ,पदाधिकारी निवडणूकीत आपली मनिषा पूर्ण करण्यासाठी खर्चाची भाषा बोलू लागले आहेत.
हवेली तालुक्याला १९ वर्षानंतर बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकी निमित्त तालुक्यात इच्छुकांचा महापूर आला आहे. अनेक हौसे, नवसे गवसे आता गुलटेकडी मार्केट यार्ड मधील बाजार समितीच्या कार्यालयात बसण्याची
स्वप्ने बघू लागली आहेत. तालुका कधी नव्हे तर बाजार समितीच्या निवडणूकीनिमित्तानं एकत्र मिसळू लागला आहे.तालुक्यात सहकारातील सोसायट्या ,ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार बहाल होणार असल्याने या मतदारांतही राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
२००२ -२००३ या वर्षात अनियमित व अनागोंदी कारभाराने संचालक मंडळ बरखास्त करावे लागलेल्या हवेली बाजार समितीवर गेली १९ वर्षे प्रशासकीय राजवट सुरु होती. मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे सुरू असलेला न्यायालयीन लढा व या लढ्यात शिंदे व फडणवीस सरकारने बाजारसमिती तालुक्याच्या पूर्वीच्या रचनेप्रमाणे तालुक्याची करण्याला दिलेला हिरवा कंदील या कारणांनी बाजार समितीची १९ वर्षानंतर प्रशासकीय राजवटीचा अंत झाला आहे. या निर्णयाने तालुक्यात सहकार अस्तित्व जिवंत राहिल्याचा आशावाद तालुक्यातील जनतेला पहायला मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते , शेतकऱ्यांत उत्साह निर्माण झाला आहे.
हवेली बाजार समिती गेली १९ वर्षे तर यशवंत कारखाना ११वर्षे प्रशासकीय राजवटीत आहे. हवेली बाजार समिती तर प्रशासकीय जोखडातून मुक्त होत नसल्याची परिस्थिती राज्यात सर्व पक्षीय सत्तेच्या काळात दिसून येत होती. आता तालुक्यातील पदांचा दुष्काळ हटल्याने सर्वपक्षीय इच्छुक आता तयारीला लागले आहेत. हवेली तालुका हा अर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने मातब्बर इच्छुकांनी आता निवडणूकीसाठी दंडावर थाप टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे इच्छुक खर्चाचे आकडे बोलू लागले आहे. त्यामुळे मतदारही चांगलेच सुखावले असुन तालुक्यात पुढील तीन महिने बाजार समितीचा ज्वर कोटींची उड्डाने घेण्याच्या तयारीत आहे.
पक्षीय पॅनेल होण्याची शक्यता कमीच ?
तालुक्यात सहकार क्षेत्र पक्षीय राजकारणात विखुरले गेले आहे. पुणे जिल्हा बॅक निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘अ’ वर्ग सोसायटी गटात मैत्रिपूर्ण लढत करावी लागली आहे. तसेच राष्ट्रवादी चे जिल्हा बॅंकेत तसेच बाजार समितीवर पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादी चे अंतर्गत एकमेकांच्या विरोधात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खडकवासला,पुरंदर-हवेली,शिरूर-हवेली, वडगावशेरी, हडपसर अशा मतदारसंघात ते पदाधिकारी विभागले आहे. अशावेळी राष्ट्रवादीला स्वतंत्र पॅनेल उभे करण्यात अडचणीचे ठरणार आहे. तर भाजपला तालुक्यात अस्तित्व असले तरी छुपी मदत घ्यावी लागणार असल्याने स्वतंत्र पॅनेलची शक्यता कमीच असणार आहे. या निवडणूकीचा मोठा प्रभाव शिरुर हवेली मतदारसंघावर होणार असल्याने आ.अशोक पवार व जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप कंद यांच्यात ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.