होळीच्या दिवशीच रंगाचा बेरंग, नदीत बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू, हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ..

ठाणे : शुक्रवारी १४ मार्चला महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने होळीचा सण साजरा करण्यात आला. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच लोक विविध रंगानी न्हावून निघाले.
मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. एकाच सोसायटीत राहणाऱ्या चार मुलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने ऐन होळीच्या दिवशी सोसायटीत आक्रोश बघायला मिळाला.
आर्यन मेदर (वय. १५), आर्यन सिंह (वय. १६), सिद्धार्थ सिंह (वय. १६), ओमसिंग तोमर (वय. १५) अशी मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत. हे सर्वजण बदलापूरच्या चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात आपल्या कुटुंबासमवेत राहत होती.
हे सर्वजण दहावीच्या वर्गात शिकत होते. सध्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. असं असताना या चारही विद्यार्थ्यांनी विरंगुळा म्हणून शुक्रवारी होळी साजरी केली. एकमेकांना भरपूर रंग लावला.दिवसभर रंगात न्हावून निघाल्यानंतर ही चारही मुलं सायंकाळच्या सुमारास उल्हास नदी पात्रात रंग धुवायला गेले.
चारही जण नदीत उतरून अंगावरील रंग धुवत होते. यावेळी यातील एका मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. यावेळी इतर तीन जणांनी आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते एकमेकांना पकडून बुडणाऱ्या मित्राला वाचवू लागले. पण समतोल बिघडल्याने चारही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.