पुण्यात उडाली खळबळ! मरकळ परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत आढळले एक दिवसाचे अर्भक..


पुणे : खेड तालुक्यातील मरकळमधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. पावसात प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन त्याचा परित्याग करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता . २०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

कुठलाही गुन्हा नसताना अवघ्या एका दिवसात पालकांनी बाळाचे पालकत्व नाकारून त्याचा परित्याग केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मरकळमधील सुदर्शन वस्ती येथे क्रिएटीव्ह इंटरप्रायजेस या कंपनीजवळून कच्चा रस्ता जातो. रिमझिम पडणाऱ्या पावसात प्लास्टिकच्या पिशवीत थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याला थंडीमुळे इन्फेक्शन झाले असल्याचे निदान झाल्याने त्याला औंध येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औंध रुग्णालयात त्या एक दिवसाच्या बाळावर पुढील तीन ते चार दिवस उपचार केले जाणार आहेत. घटनास्थळाजवळ असलेल्या एका कंपनीचे सीसीटीव्ही रस्त्याच्या दिशेने आहेत.

मात्र कंपनी मागील आठ दिवसांपासून बंद आहे. घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. आळंदी पोलीस अज्ञात पालकांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, आळंदी पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीला घटनेची माहिती दिली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने बाळाला संबंधित संस्थेत सोडले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!