आता गरजूंना मिळणार हक्काचं आणि मोठं घर, पंतप्रधान आवास योजनेत मोठा बदल, जाणून घ्या..


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना २.० च्या (पीएमएवाय) नव्या टप्प्यात घराच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली आहे, तसेच योजनेतील उत्पन्न मर्यादाही वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या अनेक कुटुंबांना आता घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान आवास योजना २.० मध्ये आता पात्र झोपडपट्टीवासीयांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ‘घर सबका’ हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित ९ भूखंडांवर, तसेच एचडीएच अंतर्गत निश्चित भूखंडांवर हे गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत निवारा मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात फक्त ३० चौरस मीटर कार्पेट एरिया असलेल्या क्षेत्रफळाचं घर दिलं जात होतं. मात्र आता, हे क्षेत्र वाढवून ४५ चौरस मीटर करण्यात आलं आहे. यामुळे लाभार्थ्यांना मिळणारं घर अधिक मोकळं, सुसज्ज आणि राहण्यायोग्य होणार आहे. केवळ आकारातच नव्हे, तर गृहप्रकल्पांच्या गुणवत्तेमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात नऊ ठिकाणी भूखंड राखीव ठेवले आहेत. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. चाऱ्होळी, आकुर्डी, बोऱ्हाडेवाडी आणि पिंपरी येथील प्रकल्प आधीच पूर्ण झाले आहेत. सध्या डुडूळगाव येथे बांधकाम सुरू आहे. रावेतमधील प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. पण, त्या लाभार्थ्यांना किवळे येथे घरं दिली जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!