आता सुधारित पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना लाभ घेणे ऐच्छिक, जाणून घ्या महत्वाची माहिती…

नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहभागी होणे किंवा न होणे याचा निर्णय आता शेतकऱ्यांच्या स्वेच्छेवर आधारित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, अधिसूचित पिकांसाठी आणि क्षेत्रांसाठी कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आता या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, अधिसूचित पिके आणि क्षेत्रांसाठी पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय स्वतः घ्यावा लागणार आहे.
हंगाम नुसार सहभाग/असहभाग नोंदणी…
मागील हंगामात सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांनी यंदा सहभागी होण्याची इच्छा दर्शविल्यास, बँकांनी त्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड खात्यात काही बदल झाल्यास किंवा योजना नको असल्यास, शेतकऱ्यांनी बँकेला स्पष्ट संमती द्यावी लागेल.

समितीच्या वेळापत्रकानुसार माहिती सादर करणे अनिवार्य..
राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, बँका व संस्था पीकनिहाय, क्षेत्रनिहाय हप्ता दरांची माहिती तयार करून विमा कंपनीकडे सादर करतात. ही रक्कम अतिरिक्त कर्ज रक्कम म्हणून मंजूर होते व अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण माहिती विमा कंपनीकडे पोहोचवली जाते.
ही योजना आता ऐच्छिक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य विचार करून निर्णय घ्यावा, व त्यानुसार विहित मुदतीत घोषणापत्र सादर करावे. यामुळे भविष्यातील आर्थिक गैरसोयी किंवा गैरसमज टाळता येतील.
शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर…
जर शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी किंवा नोंदणीच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी संबंधित बँकेत सहभाग न करण्याचे घोषणापत्र’ सादर करणे बंधनकारक आहे. हे घोषणापत्र विहित मुदतीत सादर न केल्यास, शेतकरी आपोआप योजनेत सहभागी समजले जातील व त्यांच्याकडून विमा हप्ता वजा केला जाईल.
शेतकऱ्यांच्या खात्यातून विमा हप्ता कपात करण्याची प्रक्रिया बँकांनी अंतिम नोंदणी तारखेच्या सात दिवस आधीपासून सुरू करता येईल. फक्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांचाच समावेश अंतिम यादीत केला जाईल. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती, विमा हप्ता आणि प्रस्ताव यांची माहिती बँकांनी संबंधित विमा कंपनीकडे पाठवावी लागेल.
सहभाग न होणाऱ्या शेतकऱ्यांनी सादर केलेल्या घोषणापत्रावर शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी व शिक्का असलेली पोचपावती घेणे गरजेचे आहे. तसेच, किसान क्रेडिट कार्ड ज्या शाखेत आहे, त्या शाखेतच अर्ज सादर करावा लागेल.