शाळांबाहेर ‘स्टिंग’ला नो एन्ट्री! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : राज्यातील लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली.

श्रीगोंदा-नगरचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना सरकारने हा निर्णय जाहीर केला.

यावेळी आमदार पाचपुते यांनी सभागृहात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकची बाटली दाखवत, त्यावरील “हे पेय मुले आणि गर्भवती महिलांसाठी योग्य नाही” हा इशारा वाचून दाखवला. उत्पादक कंपनीच हे पेय मुलांसाठी सुरक्षित नसल्याचे सांगत असताना शाळांबाहेर त्याची विक्री का सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच या पेयांमध्ये कॅफिन, टॉरिन आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मुलांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. ऑनलाईन विक्रीवरही नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, मुलांचे आरोग्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे शाळांच्या ५०० मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये या पेयांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीमही राबवली जाणार आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन तसेच शिक्षण विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!