नितीन गडकरी हे ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन ऑफ ॲक्शन’ – देवेंद्र फडणवीस! नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान….


पुणे : नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, माजी मुख्यमंत्री तथा ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ.गीताली टिळक, डॉ. प्रणति टिळक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे. लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठायी-ठायी दिसतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे त्यांचे नेतृत्व आहे. विलक्षण प्रतीभा त्यासोबत संवेदनशीलता आणि सातत्याने समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहेत. ते चांगले संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी, वैद्यक, उद्योग, स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे. नवनवीन बाबींकडे ते आकृष्ट होतात. या बाबी सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचता येतील असा त्यांचा प्रयत्न असतो.

गडकरी यांचा ‘नेव्हर डाय ॲटीट्यूड’ हे त्यांच्या स्वाभवाचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, श्री गडकरी हे कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात म्हणूनच ते मोठे कार्य उभे करू शकतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची यशस्वी उभारणी केल्यानेच अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जबाबदारी गडकरी यांच्यावर विश्वासाने सोपावली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यातील हीच गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर रस्ते आणि महामार्ग विकासाचे काम सोपवले. एकेकाळी जगातील पायाभूत सुविधा पाहण्यासाठी आपण अन्यत्र जात होतो, आज जग आपल्याकडे येत आहे, हे गडकरी यांचे यश आहे. त्यांच्या कार्यामुळे देशात रस्ते उभारणीच्या कामात गुणात्मक परिवर्तन सुरू झाले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख प्रस्थापित केली आहे. देशाच्या सीमेवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!