ना WhatsApp, ना डिजिटल फाईल! मोटेगावकरांच्या ‘हस्तलिखित ट्रिक’ने सीबीआयही हादरली…


पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लातूरमधील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याने पेपरफुटीसाठी वापरलेली कथित पद्धत समोर आल्यानंतर तपास यंत्रणाही हादरल्या आहेत.

“केंद्रीय अन्वेषण ब्युरो” कडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, मोटेगावकर याच्याविरोधातील पुरावे अधिक मजबूत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, NEET परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या एका ‘मॉक टेस्ट’मुळे या घोटाळ्याचा मोठा धागा हाती लागल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य परीक्षेपूर्वी 27 एप्रिल रोजी मोटेगावकर यांनी आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव परीक्षा घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ताक्षरातील तब्बल 60 पानांची प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात पाठवण्यात आली होती. तपासात या प्रश्नसंचातील तब्बल 135 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याचे समोर आले आहे.

सीबीआयला संशय आहे की, मोटेगावकर यांनी ‘गेस पेपर’च्या नावाखाली प्रत्यक्षात फुटलेली मूळ प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली होती. विशेष म्हणजे, कोणताही डिजिटल ट्रेस राहू नये म्हणून प्रश्नपत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात आता एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होत असून, तपास यंत्रणांनी काही व्हिडीओंचीही दखल घेतली आहे. या व्हिडीओंमध्ये मोटेगावकर यांनी NEET प्रश्नपत्रिकेबाबत केलेले दावे समोर आल्याने संशय आणखी गडद झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत जवळपास दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात प्रश्नपत्रिका तयार करण्याशी संबंधित लातूरमधील पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न कॉलेजमधील शिक्षिका मनिषा मांढरे यांचाही समावेश आहे. या शिक्षकांकडूनच प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचली का, याचा तपास आता सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!