वर्षभर दुर्लक्षित, पण दसऱ्याला सोन्याइतकी किंमत! आपट्याच्या पानांमागे दडलीय १४ कोटी सुवर्णमुद्रांची रहस्यमय कथा


पुणे : दसरा आला की आपट्याची पाने एकमेकांना देत ‘सोनं लुटण्याची’ परंपरा उत्साहात पाळली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आपट्याची पाने सोनं म्हणून वाटतो. पण कधी विचार केलाय का, हीच पाने दसऱ्याच्या दिवशी एवढी खास का ठरतात? ना ती खऱ्या सोन्यासारखी दिसतात, ना वर्षभर धार्मिक विधींमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तरीही विजयादशमीला या पानांना सोन्याचा मान दिला जातो. यामागे १४ कोटी सुवर्णमुद्रा, एक गुरुभक्त शिष्य आणि दानशूर राजाची रंजक पौराणिक कथा सांगितली जाते.

एका शिष्याच्या हट्टामुळे घडली अद्भुत घटना!

पौराणिक आख्यायिकेनुसार, पैठणमध्ये देवदत्त नावाच्या गृहस्थाचा कौत्स नावाचा बुद्धिमान मुलगा होता. शिक्षणासाठी तो वरतंतु ऋषींच्या आश्रमात राहिला आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना गुरुदक्षिणा देण्याचा त्याने आग्रह धरला. सुरुवातीला ऋषींनी नकार दिला; मात्र कौत्स ऐकायला तयार नव्हता. अखेर वरतंतु ऋषींनी चौदा विद्या शिकवल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी, अशा एकूण १४ कोटी सुवर्णमुद्रा आणण्यास सांगितले. विशेष म्हणजे, या सर्व मुद्रा एकाच दात्याकडून मिळालेल्या असाव्यात, अशी अटही त्यांनी घातली.

राजाचा खजिना रिकामा, तरी कौत्साला दिला शब्द!

इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करण्यासाठी कौत्स रघुराजाकडे पोहोचला. मात्र, यज्ञयागात सर्व संपत्ती दान केल्यामुळे राजाची आर्थिक परिस्थिती त्या वेळी चांगली नव्हती. आपल्याकडे आलेला याचक रिकाम्या हाताने परत जाऊ नये, या विचाराने रघुराजाने इंद्राकडून संपत्ती मिळवण्याचा निर्धार केला. ही बातमी समजताच इंद्राने कुबेराच्या माध्यमातून अयोध्येबाहेरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

१४ कोटी मुद्रा गुरूंना; उरलेल्या लोकांसाठी!

रघुराजाने सुवर्णमुद्रा कौत्साला दिल्या. कौत्साने त्यातील १४ कोटी मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून वरतंतु ऋषींना अर्पण केल्या. मात्र, उरलेल्या मुद्रा गुरूंनी स्वीकारण्यास नकार दिला. कौत्साने त्या राजाला परत करण्याचा प्रयत्न केला, पण रघुराजानेही त्या स्वतःच्या मानण्यास नकार दिला. अखेर कौत्साने या सुवर्णमुद्रा आपट्याच्या आणि शमीच्या झाडांखाली ठेवून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. ही घटना विजयादशमीच्या दिवशी घडल्याचे मानले जाते. त्यामुळे आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक मानून एकमेकांना देण्याची परंपरा रूढ झाल्याची कथा सांगितली जाते.

आपट्याच्या पानांतून मिळतो कोणता संदेश?

या परंपरेमागे केवळ संपत्तीचे प्रतीक नाही, तर गुरुभक्ती, दानशूरपणा, त्याग आणि दुसऱ्याच्या धनाचा मोह न करण्याचा विचारही दडलेला आहे. त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने देणे म्हणजे एकमेकांना समृद्धीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच प्रेम, आपुलकी आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणेही होय.

यंदा २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. यंदा आपट्याची पाने सोनं म्हणून देताना त्यामागची ही रंजक आख्यायिका आणि तिच्यातून मिळणारा संस्कारांचा संदेशही लक्षात ठेवा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!