NEET UG 2026 निकाल जाहीर! महाराष्ट्राची देशभरात दमदार छाप; मुलींमध्ये श्रावणी कुदळे अव्वल, राज्यातील अनेक विद्यार्थ्यांची टॉप रँकमध्ये बाजी


मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने NEET UG 2026 परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर केला असून, यंदाच्या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. अशा तणावपूर्ण वातावरणातही राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत वैद्यकीय शिक्षणाच्या शर्यतीत दमदार उपस्थिती नोंदवली आहे.

यंदा देशभरातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ११.२१ लाख विद्यार्थी पात्र ठरले असून, एकूण यशाचे प्रमाण जवळपास ५६ टक्के आहे. राष्ट्रीय स्तरावर पंजाबमधील विद्यार्थ्याने अव्वल स्थान पटकावले असले, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कामगिरीही तितकीच लक्षवेधी ठरली आहे.

यंदाच्या निकालातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे श्रावणी कृष्णा कुदळे हिने केलेली कामगिरी. श्रावणीने देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. एकूण राष्ट्रीय गुणवत्तायादीत तिने पाचवे स्थान मिळवले असून ती राज्यातील सर्वोच्च मानांकित विद्यार्थिनी ठरली आहे.

याशिवाय मोहनीश मारुती भोसले याने राष्ट्रीय स्तरावर दहावा क्रमांक पटकावत महाराष्ट्रातील दुसरे सर्वोत्तम यश मिळवले. त्याचबरोबर सानिध्या क्षितिज डोंगरे (२८ वा), प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे (३३ वा), रौशमीत गुप्ता (३४ वा), सोहम निशिकांत पाटील (५३ वा), सागर राजेश करीकर (६७ वा), सौम्या बदोले (७७ वा), अनुश्री अजय थोरात (८५ वा) आणि आर्या अभिजित दिवेकर (९० वा) यांनीही राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळवत राज्याचा झेंडा उंचावला.

याशिवाय अतुल्या बाळासाहेब डोंगरे, सार्थक महेश पाटील, अर्णव लाहोटी, सहिम सादिक पटवेगार, सुहाना सलीम शेख, अमीर वरावल्लाह, सार्थक पेठकर आणि श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवत राज्याच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले आहे.

गेल्या काही महिन्यांत NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पुन्हा परीक्षा आयोजित केली. अनिश्चितता, मानसिक ताण आणि अतिरिक्त तयारी या सर्व आव्हानांवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.

आता निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. देशभरातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांसाठी होणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या या दमदार कामगिरीमुळे राज्याचा वैद्यकीय शिक्षणातील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!