NEET तपासात लातूर हादरलं! CBI च्या रडारवर प्राध्यापक; मोबाईलमधील ‘त्या’ पुराव्याने वाढल्या अडचणी


लातूर : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, तपासाच्या आघाडीवर लातूरमधून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कोचिंग क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आता तपासाचा फोकस शैक्षणिक क्षेत्रातील संभाव्य संपर्कांवर वळवला असून, एका नामांकित महाविद्यालयातील वरिष्ठ रसायनशास्त्र प्राध्यापकांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीबीआयचे विशेष पथक लातूरमध्ये दाखल झाले. तपासाचा भाग म्हणून संबंधित प्राध्यापकांना सकाळी आठ वाजता शासकीय विश्रामगृहात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांच्या मुलीने मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासमधून तयारी केली असल्याने तिलाही प्रवेशपत्रासह चौकशीसाठी बोलावण्यात आले. विद्यार्थिनीची सुमारे तीन तास चौकशी करून तिला सोडण्यात आले, मात्र प्राध्यापकांची चौकशी दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होती.

चौकशीदरम्यान सीबीआयने प्राध्यापकांचा मोबाईल जप्त केला असून, डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात परीक्षेपूर्वी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित संशयास्पद संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. हा मोबाईल आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, चॅट, कॉल रेकॉर्ड, फाइल्स आणि इतर डिजिटल डेटाची सखोल छाननी केली जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सीबीआयने प्राध्यापकांना प्रश्नपत्रिका कशी मिळाली, मोटेगावकर यांच्याशी नेमके संबंध काय होते, आर्थिक व्यवहार झाले का आणि प्रश्नपत्रिका इतर कोणाला पाठवण्यात आली होती का, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले. प्राध्यापकांनी मोटेगावकर यांनी प्रश्नपत्रिका पाठविल्याची बाब मान्य केली, मात्र ती परीक्षा होण्यापूर्वी उघडून पाहिली नसल्याचा दावा केला. तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे नाकारत, मुलीच्या क्लासची फी रोख स्वरूपात भरल्याचे त्यांनी सांगितले.

प्राध्यापकांनी मोटेगावकर यांची भेट केवळ मुलीच्या शिक्षणासंदर्भात झाल्याचे स्पष्ट केले. प्रश्नपत्रिका इतर कोणाकडे पाठवली का, याबाबत त्यांनी कोणताही सहभाग नसल्याचे सांगत परीक्षा संपल्यानंतरच त्या प्रश्नांकडे पाहिल्याचा दावा केला. मात्र तपास यंत्रणा त्यांच्या जबाबांची डिजिटल पुराव्यांशी पडताळणी करत आहे.

सध्या सीबीआयने प्राध्यापकांना अटक केलेली नसली तरी त्यांच्यावर संशयाचे सावट कायम आहे. फॉरेन्सिक अहवाल, मोबाईलमधील डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासाची व्याप्ती वाढत असून, लवकरच आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून वर्तवली जात आहे. NEET पेपरफुटी प्रकरणातील ही कारवाई तपासाला नवे वळण देणारी ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!