दौंडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी डॉ. वंदना मोहिते यांना अटक, पोलिसाला मारहाण प्रकरणी कारवाई
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ वंदना मोहिते (रा. केडगाव) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कासूर्डी टोलनाका येथे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करत होते.
त्यावेळी वंदना मोहिते यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना १५ जून रोजी घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी वंदना मोहिते यांना गुरुवारी रात्री उशिरा राहत्या घरातून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी (ता. १५) पालखी मार्गावर कासुर्डी टोलनाका येथे कर्तव्यावर असणारे पोलीस नाईक नितीन कोहक हे वाहतुक व्यवस्थापन करत होते. त्या ठिकाणी चार चाकी गाडी मधून आलेल्या डॉ. वंदना मोहिते यांनी गाडी सोडण्या वरुन हुज्जत घातली. या वादात मोहिते यांनी कोहक यांच्या थोबाडीत मारली.
दरम्यान, झालेल्या प्रकारावरून वंदना मोहिते यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. डॉ. मोहिते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत.