अजित पवारांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार? बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांना राष्ट्रवादीचा अल्टिमेटम; ‘राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी अटळ’


बारामती : बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या किशोर मासाळ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने स्पष्ट शब्दांत इशारा देत मासाळ यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

बारामतीतील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष किरण इंगळे आणि तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. नुकताच एका महिलेच्या तक्रारीवरून मासाळ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अजित पवार यांच्याबाबत कथितरित्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले आणि संपूर्ण बारामतीत संतापाची लाट उसळली.

पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मते, बारामतीकरांच्या भावना अजित पवार यांच्याशी घट्ट जोडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्याच नगरसेवकाने दिवंगत नेत्यांचा एकेरी उल्लेख करत केलेले वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मासाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जात होते. अखेर शुक्रवारी मध्यस्थांच्या माध्यमातून झालेल्या भेटीत पक्षाने त्यांच्यासमोर स्पष्ट भूमिका मांडली.

मात्र, मासाळ यांनी तातडीने निर्णय घेण्याऐवजी विचार करण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. यावर नाराजी व्यक्त करत पक्ष नेतृत्वाने आता अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे. नगरसेवकाच्या राजीनाम्यासाठी काही कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षाची अपेक्षा आहे.

किरण इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर मासाळ यांना अजित पवारांविषयी खरोखर आदर आणि प्रेम असेल, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. उलट संबंधित ऑडिओमधील आवाज आपलाच असल्याचे त्यांनी मान्य केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार समर्थक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून सोमवारी (८ जून) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पुढील दोन दिवसांत मासाळ यांनी राजीनामा न दिल्यास पक्षाकडून कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यात येईल. तसेच पक्षातून हकालपट्टीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येऊ शकते. त्यामुळे आता किशोर मासाळ यांची पुढील भूमिका काय असणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार, याकडे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!