नविद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष!! सतेज पाटील गटाला मोठा धक्का…

कोल्हापूर : येथील गोकुळच्या अध्यक्षपदावर अखेर नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. अनेकांनी यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. या अध्यक्षपदाभोवती राजकीय वादळ घोंघावत होते. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमधील नेतृत्वाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा सुरू होती.
अखेर निर्णायक बैठकीत नविद मुश्रीफ यांच्या नावावर एकमत झाले आहे. सुरुवातीला हसन मुश्रीफ यांनीच या निवडीला विरोध दर्शवला होता. तरीही त्यांच्या नावावरच अंतिम निर्णय घेण्यात आला आहे, आणि त्यामुळे या निवडीमागे राज्यपातळीवरून झालेला हस्तक्षेप देखील समोर आला आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकारण येणाऱ्या काळात महत्वाचे असणार आहे.
तसेच महाडिक गटाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरही गोकुळमधील निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलगा गोकुळच्या अध्यक्षपदावर असून हसन मुश्रीफ सध्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्था मुश्रीफ कुटुंबाच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच ते राज्य सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.
महत्वाच्या संस्था जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेल्या असल्यामुळे, स्थानिक राजकारणात याचे मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष असावा, अशी स्पष्ट भूमिका घेतली. यामुळे अनेकांनी शांत राहणे पसंद केले. यामुळे ही निवड झाली.
गोकुळच्या संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव बाजूला पडले आणि नविद मुश्रीफ यांच्या नावावर एकमत झाले. बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करत नाव ठरवलं आणि ते बंद लिफाफ्यात सुपूर्त करण्यात आलं. आज हा लिफाफा उघडण्यात आला आणि नविद मुश्रीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.