“मी तुम्हाला पचणार नाही…” नानांनी थेट नाकारली होती फडणवीसांची उमेदवारीची ऑफर; नकारामागचं नेमकं कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांचा वावर केवळ सिनेसृष्टीपुरता मर्यादित नव्हता, तर समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचे अनेकांशी जवळचे संबंध होते.

नाना पाटेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा यापूर्वी अनेकदा रंगल्या होत्या. मात्र, आता भाजपकडून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक जुना प्रसंग सांगितला आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत आशिष शेलार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांना भाजपकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली होती, असा खुलासा केला.


नाना पाटेकरांना निवडणूक लढवण्याची ऑफर कशी दिली?
आशिष शेलार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना आणि आपण मुंबईचे अध्यक्ष असताना एका निवडणुकीच्या वेळी उमेदवार निवडण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी एखाद्या अभिनेत्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा विचार पुढे आला.
या चर्चेदरम्यान नाना पाटेकर यांचे नाव समोर आले. देवेंद्र फडणवीस आणि आपले याबाबत एकमत झाल्यानंतर नाना पाटेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यांना संबंधित जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
फोनवरील चर्चेनंतर नाना पाटेकर यांनी आशिष शेलार यांना आपण कुठे आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या घरी येऊन प्रत्यक्ष बोलायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘तुम्हाला मी पचणार नाही’; नाना पाटेकरांनी का नाकारली ऑफर?
आशिष शेलार यांनी सांगितल्यानुसार, दोन दिवसांनंतर नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांची भेट झाली. दुपारच्या जेवणानंतर दोघांमध्ये याबाबत चर्चा झाली. त्यावेळी नाना पाटेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नाना पाटेकर म्हणाले की, तुम्ही माझे मित्र आहात. मात्र, राजकारणात गेल्यानंतर मला जे वाटेल ते मी मोकळेपणाने बोलेन. त्यामुळे तुम्हाला अडचणीत आणण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. निवडणूक जिंकल्यानंतरही मला जे आवश्यक वाटेल ते मी बोलणार. त्यामुळे तुम्हाला अडचणीत आणण्याची वेळ येऊ नये, असे नानांनी स्पष्ट केल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
‘तुम्हाला मी पचणार नाही,’ अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी आपली भूमिका मांडली होती. अखेरीस ‘तुम्ही तुमचं बघा रे बाळांनो,’ असं म्हणत त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारला होता, अशी आठवण आशिष शेलार यांनी सांगितली.
नाना पाटेकर यांनी राजकारणात प्रवेश करण्याऐवजी आपल्या स्पष्टवक्तेपणाला आणि स्वतंत्र विचारांना महत्त्व दिलं होतं, हे या प्रसंगातून दिसून येतं. त्यांच्या या भूमिकेची आठवण सांगताना आशिष शेलार यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
