नागपूर हिंसाचार प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्वात मोठा निर्णय..

नागपूर : महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण लागलं. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, दंगल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर शहर हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे.
सोमवारी रात्री झालेल्या या हिंसाचारात ८ ते १० पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या चार जवानांनाही मारहाण करण्यात आली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर आणि लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, यानंतर महानगरात महाल भागासह संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल झालेल्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले.