‘प्रेम, नकार अन् पेट्रोलचा खेळ…’; बँक कर्मचाऱ्याच्या जळालेल्या मृतदेहामागचं धक्कादायक सत्य उघड, पोस्टमॉर्टेमने उलटलं संपूर्ण प्रकरण

इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका तरुणीच्या मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला गॅस गळतीमुळे झालेला अपघात किंवा आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असताना, वैज्ञानिक तपास आणि पोस्टमॉर्टेम अहवालातून हा थंड डोक्याने रचलेला खून असल्याचे समोर आले आहे. बँकेत कार्यरत असलेल्या पलक काशिव यांच्या मृत्यूमागील सत्य उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
26 जुलै रोजी खजराना परिसरातील तपेश्वरी बाग कॉलनीतील भाड्याच्या घरातून धूर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. घराचे दार उघडल्यानंतर खोलीत सर्वत्र धूर, जळालेले साहित्य आणि पलक यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळाची स्थिती पाहता सुरुवातीला आग लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, पोलिसांनी कोणताही निष्कर्ष न काढता फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले.

दरम्यान, पलक गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हत्या. त्यांच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते. त्याच काळात हा प्रकार उघडकीस आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.


पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आल्यानंतर तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. अहवालात पलक यांचा मृत्यू आगीत होण्यापूर्वीच झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा निष्कर्ष तपासात समोर आला.
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. एका तरुणाच्या हातात पेट्रोलचा डबा दिसत असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील मयंक शाक्य याला ताब्यात घेतले.
चौकशीत मयंक आणि पलक गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून अनेक दिवसांपासून मतभेद सुरू होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पलक यांनी लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या मयंकने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जाळून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
एफएसएलच्या अहवालासह घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले नमुने, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे यामुळे आरोपीविरोधातील संशय अधिक बळकट झाला आहे. पोलिसांनी मयंक शाक्य याला अटक करून हत्या, पुरावे नष्ट करणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित होती का, आरोपीने आधीपासूनच पेट्रोल आणि इतर साधनांची व्यवस्था केली होती का, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. एका तरुणीच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा कथित प्रयत्न फॉरेन्सिक तपास आणि सीसीटीव्हीमुळे उधळून लागल्याने हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.