मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या किमतीत इतक्या टक्क्यांनी होणार वाढ

मुंबई : वाढत्या महागाईचा फटका आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्या नागरिकांनाही बसण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, खाद्यतेल आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. याचा परिणाम आता हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर येत्या एक ते दोन आठवड्यांत १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ संघटनेकडून दरवाढीबाबत संकेत देण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ बाजारात भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या किमती वाढल्या आहेत. रोजच्या वापरातील भाज्या, विविध डाळी आणि खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर परिणाम होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात दाखल होणाऱ्या शेतमालाची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली आहे.


याशिवाय व्यावसायिक गॅसच्या किमती आणि व्यावसायिक जागांचे भाडे वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात भर पडली आहे. कच्च्या तेलाच्या बाजारातील अस्थिरता आणि वाढत्या महागाईमुळे हॉटेल व्यवसाय चालवण्याचा खर्च वाढत असल्याचे चित्र आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते २० रुपयांची वाढ?
वाढत्या खर्चामुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे ‘आहार’ संघटनेचे म्हणणे आहे. चहा आणि नाश्त्याच्या पदार्थांच्या किमतीत यापूर्वीच वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. आता हॉटेलमधील अनेक खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते २० रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवाढ लागू झाल्यास हॉटेलमध्ये नियमित जेवणाऱ्या नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. विशेषतः रोज हॉटेलमध्ये जेवणारे नोकरदार, शिक्षणासाठी घरापासून दूर राहणारे विद्यार्थी आणि ऑनलाइन जेवण मागवणाऱ्या नागरिकांच्या मासिक बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात नवे दर लागू होणार?
मुंबई आणि परिसरात ‘आहार’ संघटनेचे २५ हजारांहून अधिक सदस्य असून, त्यामध्ये रेस्टॉरंट आणि बारचाही समावेश आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे.
मात्र, प्रत्यक्ष दरवाढ किती असेल आणि कोणत्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील, याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. दरवाढ लागू झाल्यास मुंबईकरांना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांकडून नव्या दरांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
