मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण! सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका..

मुंबई : अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि २०९ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या २००६ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये ११ मिनिटांत सात ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता.
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आजच्या सुनावणीला आरोपींनी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लावली हजेरी लावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.