मुंबई- पुणे हायवे आज पुन्हा एकदा बंद! जाणून घ्या महत्वाची माहिती..

पुणे : मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जागोजागी पाणी साठून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहयला मिळत आहे. यादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
मुंबई पुणे महामार्गावर काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत हा ब्लॉक असणार आहे. तसेच या वेळेत महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असताना गुरूवारी रात्री कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली.
गुरूवारी रात्रीच्या सुमारासदरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असली मात्र अजूनही कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ काही प्रमाणात कोसळलेल्या दरडीचा भाग रस्त्यावरच आहे.
त्यामुळे आज दुपारी २ ते ४ यावेळेत मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळे पासून वळवली जाणार आहे. तर मुंबई शहराकडे येणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने सुरू असेल आणि ती लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. तसेच महामार्गाहून पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील.