Mumbai Dharavi : धारावीत मोठा धुमाकूळ, मशिदीच्या अवैध भाग तोडण्यावरून वाद पेटला, पोलिसांनी वाढवला फौजफाटा..


Mumbai Dharavi : मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचे सांगितले जात आहे. धारावीत असणाऱ्या एका मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी बीएमसीचे एक पथक गेले असता मशिदीचा अवैध भाग तोडण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांनी गोंधळ घातला आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक केली.

यामुळे धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे शेकडोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान, धारावीतील वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे.

तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असून, शांततेचे आवाहन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावीत एक मशीद आहे. मात्र या मशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात आहे. धारावी शहरातील ९० फूट रोडवरील २५ वर्षे जुनी अशी ही सुभानिया मशीद आहे. या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी आज बीएमसीचे पथक धारावीत गेले होते. Mumbai Dharavi

दरम्यान, मशिदीचा अवैध भाग तोडला जाणार आहे, याची माहिती धारावीतील नागरिकांना मिळाल्यानंतर ही कारवाई रोखण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच याठिकाणी आंदोलन सुरू केले होते. धारावीतील लोकांचे म्हणणे आहे की, ही मशीद २५ वर्षे जुनी आहे. मशिदीसोबत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.

त्यामुळे ही मशीद पाडू नये. परंतु बीएमसी अधिकारी आज या मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी धारावीकडे रवाना झाले. त्यामुळे धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही, अशी ठाम भूमिका धरावीकरांनी घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!