नाटकाची फ्री पास नाकारल्याने खासदार कोल्हे यांना धमकी, प्रकरण फडणवीसांकडे..
पुणे : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर शिवपुत्र संभाजी महानाट्याचे सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.
याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाटकाचे पास दिले नाही तर सादरीकरण कसे होते ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती त्यांनी देत खंत व्यक्त केली आहे.
मंचावरून खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलिसांना समज द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे हे पोलीस कोण आहेत, याबाबत चर्चा सुरू आहे.
यावेळी वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असे डॉ. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितले. अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस कर्मचा-याचे नाव समोर आलेले नाही.