लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला हलविण्यास खासदार डॉ. अमोल कोल्हें यांचा विरोध


लोणी काळभोर, ता. १४ : नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होऊ नये म्हणून लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला हलविण्यास खासदार डॉ. अमोल कोल्हें यांनी विरोध केला आहे. सदर केंद्र लोणी काळभोर येथेच कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, आळंदी म्हातोबाची तसेच परिसरातील अनेक गावांतील हजारो नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रासाठी सेतू सुविधा केंद्रास मंजुरी देण्यात आली होती. परंतु, हे केंद्र मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामपंचायत लोणी काळभोरसह इतर गावांतील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिलेल्या निवेदनात हे केंद्र प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ते शहरी भागात हलविल्यास ग्रामीण नागरिकांना विविध दाखले, जात व उत्पन्न प्रमाणपत्रे, महसूल विषयक अर्ज तसेच इतर शासकीय सेवांसाठी अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा अनावश्यक अपव्यय होणार असून, केंद्राच्या स्थापनेमागील मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल. असे नमूद केले आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीने सेतू सुविधा केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून याबाबत प्रशासनाला लेखी कळविण्यात आले आहे. त्यामुळे जागेचा कोणताही प्रश्न निर्माण होत नसल्याचेही खासदार कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यांमुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेले सेतू सुविधा केंद्र मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा आणि हे केंद्र लोणी काळभोर येथेच कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सेतू केंद्र हलवण्याची तयारी सुरू झाली असल्याने या प्रश्नावर आता ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून, सेतू सुविधा केंद्र लोणी काळभोरमधून हलविण्याचा निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेतही स्थानिक पातळीवरून दिले जात आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!