राज्यात लोकसंख्येने सर्वात मोठा असलेल्या हवेलीत तालुक्यात कुणबी पुरावे शोधण्यात आली गती ! हवेलीत आतापर्यंत किती पुरावे मिळाले घ्या माहिती..!!

उरुळीकांचन : लोकसंख्येने राज्यात सर्वात मोठा महसुली तालुका असणाऱ्या हवेली तालुक्यात दिवाळी सणाच्या सुट्ट्या संपल्यानंतर कुणबी -मराठा, मराठा -कुणबी जातींच्या पुरावे शोधण्याचा कामाला गती मिळाली आहे. हवेली तालुक्यात कुणबी नोंद शोधण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून तालुक्यात आतापर्यंत महसूली अभिलेख कक्षातून १ लाख १९ हजार ०८१ विविध प्रकारचे दाखल्यांची तपासणी करण्यात येऊन प्रत्यक्षात १४८७ इतक्या कुणबीच्या नोंदी आढळून आल्याची माहिती हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी दिली आहे.

साधारण ३२ लाख लोकसंख्या असलेल्या हवेली तालुक्यात कुणबी-मराठा, मराठा -कुणबी नोंदी शोधण्याचे आव्हान तालुका महसूल प्रशासनापुढे आहे.तालुक्यातील अभिलेख कक्षातून जुन्या म्हणजे १९६७ पूर्वीच्या नोंदी तपासणीचे काम सुरू झाले आहे. या तपासणीत तहसील कार्यालयात जतन असलेल्या अभिलेख कक्षा तून नोंदी तपासणीचे काम सुरू झाले आहे. दिवाळी संपल्यानंतर कर्मचारी पुन्हा या कामावर रुजू झाले असून १ लाख १९ हजार ८१ इतके अभिलेख तपासले आहेत. तहसिल महसूल अभिलेखात खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, राष्ट्रीय नागरीक रजिस्टर, नमुना नोंद पत्रक, हक्क पत्रक, शेतकरी ७/१२ इ. अभिलेखांत पुरावे शोधण्यात येत आहे.
महसुली अभिलेखांसह तहसिल कार्यालयाअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क, शैक्षणिक अभिलेख (प्राथमिक शाळा ), करागृह अधिक्षक, पोलिस, रेल्वे व जिल्हा निबंधक तसेच मुंद्राक विभाग यांच्याकडून अभिलेख मिळावे म्हणून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हवेली तालुक्यात महसुली अभिलेखांसह जिल्हा परिषद शाळांत जातीच्या दाखल्यांचे पुरावे शोधण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी तसेच तालुका गटविकास अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक यांचा अभिलेखांचे रेकॉर्ड कार्यालयाकडे जमा करण्याचे कालावधी ठरवून देण्यात आला आहे.

हवेली तालुक्यात किल्ले सिंहगड स्थान तसेच शिवकालीन स्वराज्याचा लढ्यात वंशंजांची नोंद असण्याची शक्यता असल्याने कुणबी नोंदीचे पुरावे अधिक प्रमाणात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने शिवकालीन, ब्रिटिशकालीन पुरावे शोधण्यासाठी महसूल प्रशासन विशेष प्रयत्नशील असणार आहे. तहसील कार्यालयाकडून नोंदी तपासण्यासाठी मोडीलिपी वाचक प्रमाणपत्र असणाऱ्या काही अभ्यासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील १५८ गावांतून तलाठी सजांतून पुरावे शोधण्या त येत आहे. चालू अभिलेख तपासणीत धायरी, वडगावखुर्द , उंड्री, महंमदवाडी या सजांतील पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य काही भागातील अभिलेखांत १ लाख १९ हजार ८१ अभिलेख तपासून १४८७ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
“ तालुक्यात कुणबी पुरावे शोधण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तहसील अभिलेख , मंडळ व तलाठी सजा तसेच जिल्हा परिषद शाळांतील १९६७ पूर्वीचे सर्व अभिलेख माघविण्यात आले आहे. कुणबी पुरावे शोधण्यासाठी तालुक्यात नियोजन कालावधी, प्रशासकीय दृष्ट्या सुयस्कर कामकाज व्हावे म्हणून प्रशासन प्रयत्न करणार आहे”
–किरण सुरवसे, तहसिलदार , हवेली.