शिरूर-हवेली तालुक्यात ३५ कोटी २७ लाखांहून अधिकची विविध विकासकामे मंजूर; गावागावातील मूलभूत सुविधांना मिळणार चालना

शिरूर : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२६-२७ अंतर्गत शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पहिल्या टप्प्यात एकूण १ कोटी २० लाख रुपयांच्या ११ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या पुढाकारातून ही कामे मंजूर झाली असून, यामुळे विविध गावांमधील सार्वजनिक सुविधा व मूलभूत विकासकामांना गती मिळणार आहे.
मंजूर कामांमध्ये कुरुळी व चिंचणी येथील स्मशानभूमींसाठी पत्रा शेड, तांदळी म्हसोबावाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभामंडप, निमगाव म्हाळुंगी येथे अण्णाभाऊ साठे सभामंडप, न्हावरे येथील तांबेवस्ती परिसरातील रस्ता तसेच श्रीनाथ म्हसोबा मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा समावेश आहे.

याशिवाय वडगाव रासाई येथील खंडोबा मंदिर सभामंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ओटा व फरशीचे काम, उरळगाव येथील जांभळकर वस्ती श्रीनाथ म्हसोबा मंदिर सभामंडप तसेच कांदरे वस्ती ते जांभळकर वस्ती रस्ता काँक्रीटीकरण आणि न्हावरे येथील सावता माळी मंदिरासमोरील सभामंडप आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.


“गावागावातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच सार्वजनिक, सामाजिक आणि धार्मिक स्थळांचा विकास करण्याला आमचे प्राधान्य आहे. मंजूर झालेल्या कामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन सोयी-सुविधांमध्ये निश्चितच वाढ होईल. ‘विकासाची नवी सुरुवात, गावागावात प्रगती’ या संकल्पनेतून मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच माध्यमातून लवकरच मतदारसंघात ३५ कोटी २७ लाखांपेक्षा अधिक निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.”
— आमदार माऊली आबा कटके