पवार कुटुंबियानंतर माढयात मोहिते पाटील कुटुंबियांचे कसब पणाला !


माळशिरस : माळशीरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणी उत्तमराव जानकर हे दोन गट हाडवैरी समजले जात मात्र राजकीय वेळेची  गरज आणी राजकीय मुत्सद्देगीरी म्हणून या दोन गटांनी बेरीज केली असून या बेरजेमुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले आहे.  सात दशकांपासून राजकीय हाडवैरी समजल्या जाणा-या मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक या दोन गटांच्या मनोमिलनाचा मेळावा नुकताच झाला.

शंकरराव मोहिते-पाटलांपासून सुरू झालेला मोहिते-पाटील गट व विरोधी गटाच्या राजकीय संघर्षाला सात दशकांनंतर तिस-या पिढीच्या नेत्यांनी मनोमिलनाचा प्रयोग केला आहे. या मनोमीलनामुळे भाजपपुढे मोठे राजकीय आव्हान उभे राहीले आहे. मोहिते पाटील गट व विरोधी गट या दोन गटांतील लढाई गेल्या सात दशकांपासून विविध पक्षांच्या मदतीने सुरू आहे. विरोधी गट अनेक पक्षांत विखुरलेला असला तरी सध्या नव्या पिढीने दोन्ही गटांवर होणा-या अन्यायाला एकजुटीने ताकद देण्याचा नवा प्रयोग तालुक्यात प्रथमच केला असून, यात कितपत यश येणार हा येणारा काळ ठरवणार आहे.

२००९ मध्ये राखीव झालेल्या माळशीरस मतदारसंघात खाटीक धनगर जातीच्या दाखल्यावर जानकर यांनी विधानसभेची लढवलेली निवडणूक विरोधी गटाला कलाटणी देणारी ठरली. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतसह विविध निवडणुकांमध्ये विरोधी गटाला विविध पक्षांकडून, नेत्यांकडून ताकद मिळत गेली. २०१९ च्या विधानसभेत निसटता पराभव पदरी पडला. यानंतर मात्र प्रत्येक निवडणुकीत जानकरांची भूमिका निर्णायक ठरली. कालांतराने त्यांचा प्रभाव वाढत राहिला. निवडणुकीच्या वेळी एकत्र येत मोहिते पाटील गटाला दमछाक करण्याची आक्रमक पद्धत, कडवा विरोध सर्वश्रुत आहे.

१९५२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शंकरराव मोहिते- पाटील यांनी अपक्ष आमदार होत राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी राजकीय – सामाजिक आणि सहकार व शिक्षण अशा विविध क्षेत्रात भरारी घेत गटाची बांधणी मजबूत होत असतानाच पश्चिम भागातील पट्ट्यात मोहिते-पाटील गटाला विरोध वाढत गेला.सत्ता व मोठी ताकद एका बाजूला, दुसरीकडे फक्त विरोधकांची अनेक गावे. विरोधकांना आपले करून घेण्यात मोहिते-पाटील गट अपयशी ठरत गेला. वर्षानुवर्षे होणा-या विविध निवडणुकांमधून दोन्ही गटातील दरी वाढत राहिली.

तुतारीचे भाजपविरोधात रणशींग
काळात विरोधी गटात संघर्ष करणारी अनेक नेतृत्व पुढे आली. यातील अनेक नेतृत्व मोहिते-पाटील गटाला मिळाली असली तरी गट मात्र आपले अस्तित्व कायम टिकवून राहिला आहे. १९७८ साली विरोधी गटाचे शामराव पाटील यांनी विधानसभा जिंकली. अ‍ॅड. सुभाष पाटील व उत्तमराव जानकर यांची विरोधी गटातील कारकीर्द प्रभावशाली ठरली. कालांतराने मोहिते पाटील यांनीही राजकीय चाल बदलली मात्र यंदाच्या लोकसभेला तुतारी हाती घेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात रणशींग फुंकले.

भाजपला तगडे आव्हान
मोहिते पाटील गटाने राजकीय चातुर्य दाखवत आपल्या पारंपरिक विरोधकांशी बेरीज करत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. धनगर समाजात असलेली उत्तमराव जानकर यांची लोकप्रीयता मोहिते पाटलांसाठी फायद्याची तर भाजपसाठी नुकसानीची ठरणार आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटील विरोधकांची मोट बांधली असली तरी मोहिते पाटलांनी जानकरांशी बेरीज करून दिलेले हे उत्तर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!