आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या!! महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कोर्टाकडून महत्त्वाचे आदेश…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध अलीकडेच पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

तसेच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत हे आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले होता. आता PMLA कोर्टाकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान आता विशेष पीएमएलए कोर्टाने आमदार रोहित पवार यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. कोर्टानं रोहित पवार यांच्यासह इतर आरोपींना समन्स बजावलं आहे. सर्वांना २१ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रोहित पवार, त्यांचे जवळचे सहकारी आणि व्यापारी राजेंद्र इंगवले आणि पवार यांची फर्म बारामती अॅग्रो लिमिटेड यांना समन्स देण्यात आलं आहे. यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवार आणि इतर आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात प्रथमदर्शनी रोहित पवार आणि इंगवले या प्रकरणी जाणूनबुजून सहभागी असल्याचं कोर्टाच निरीक्षण आहे. या निरीक्षणानंतर कोर्टानं रोहित पवारांसह इतर आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.