मंत्र्याच्या मुलाने ३ लग्नं केली, आम्ही असं केलं असतं तर मिडिया घरासमोर जमला असता, राज्य हदरवाऱ्या प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल…

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने छत्रपती संभाजीनगरचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

या नोटीसमध्ये सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे की, एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि आता संबंधित महिलेला धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या महिलेच्या वकिलांमार्फत मुलाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मग यावर सगळे लोक गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, आम्ही असं काही केलं असतं, तर संपूर्ण मिडिया आमच्या घरासमोर जमा झाला असता. महिला आयोगाकडेही आम्ही विनंती करतो की, तुम्ही या प्रकरणात गप्प बसणार आहात का? आम्ही रुपाली चाकणकर ताईंना हात जोडून विनंती करतो की, ती महिला मुंबईतच राहते, कृपया तिला भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.