कदमवाकवस्ती येथील गोडाऊनला भीषण आग; सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक…


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या गोडाऊनला वायरचे शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे ऐन दिवाळीत दुकानदारावर मोठे संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना मधुबन मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या शिवम हॉस्पिटल परिसरात रविवार (१९ ऑक्टोबर) रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या परिसरात जेके सेल्स हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे मोठे दुकान आहे. सदर दुकान अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी हे दोघे भागीदारी तत्वावर चालवितात. या दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, फॅन, गिझर, फिल्टरसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. दुकानाचे गोडाऊन शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. या गोडावूनमध्ये अंदाजे २ कोटींहून अधिक रुपयांचा माल दिपावली विक्रीसाठी साठवून ठेवला होता.

रविवारी रात्री काही नागरिकांना गोडाऊनच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे गोडाऊनच्या दिशेने जाणारी वायर जळत असताना दिसली. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती जेके सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. ते घटनास्थळावर पोहचले त्यावेळी गोडाऊनच्या शटर मधुन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. कांहीं वेळांत आगीने भिषण रौद्र रूप धारण केले.

       

या घटनेची माहिती तत्काळ हडपसर येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणात आगीचे लोट बाहेर पडत असल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संचालक आणि कामगारांनी गोडावूनचे चारही शटर तोडून टाकले. आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत बहुतांश वस्तूंना आगीने घेरले होते.
यादरम्यान एका फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली. अर्ध्या तासानंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला परंतु, आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशामक दलाची दुसरी गाडी बोलावण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत आगीत सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन, आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तीन व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे 3 कोटींहून अधिक रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. त्यातच आता जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन जळून खाक झाले आहे. यामध्ये 2 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. असे एकूण 5 कोटी रुपयांचा दुकानदाराला फटका बसला आहे.

दिवाळीनिमित्त मागणीची शक्यता लक्षात घेऊन गोडावूनमध्ये ३५९ फ्रिज, ५० टीव्ही, ९० वॉशिंग मशीन, ४० कुलर, ७० एसी, १२ पिठाची गिरणी, ५ फॅन, ४९ गिझर, २५ फिल्टरसह अशा 2 कोटींहून अधिक रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेमुळे आम्ही आर्थिक गर्तेत सापडलो आहोत. विमा कंपन्यांनी याचा तात्काळ पंचनामा करून जास्तीतजास्त नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर बँकांनी कर्जफेडीसाठी मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. – अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी (नुकसानग्रस्त व्यावसायिक)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!