मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन बदलला! 5 हजारांऐवजी आता 50 लोक… दुपारपर्यंत परवानगी नाही मिळाली तर मोठं पाऊल


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांकडून त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असतानाही मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

सुरुवातीला जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पाच हजार समर्थकांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी नाकारण्यात आली. आता मनोज जरांगे पाटील मोजक्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्या प्रवासादरम्यान तीन ठिकाणी मुक्काम असणार आहे.

मनोज जरांगे पाटील साधारण सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे. मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग यापूर्वीच जाहीर केला आहे.

दरम्यान, आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आता नव्याने अर्ज करण्यात आला आहे. या अर्जामध्ये 50 लोकांना आंदोलनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी घातलेल्या सर्व नियम व अटी मान्य करून आंदोलन करण्यात येईल आणि दिलेल्या वेळेतच आंदोलनाला सुरुवात केली जाईल, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या नव्या अर्जावर आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. जर यावेळीही आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली, तर मनोज जरांगे पाटील न्यायालयात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी दिली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने यापूर्वीच मान्य केल्या असून, काही मागण्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, पोलिसांनी पुन्हा आंदोलनाला परवानगी नाकारली तरी आपण एकटे मुंबईला जाणार आहोत. इतर समर्थकांनी त्यांच्या इच्छेनुसार यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांकडून कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, असे असतानाही मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. नव्या अर्जामध्ये त्यांनी आता 50 समर्थकांना आंदोलनासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जरांगे पाटील सरकारवर गंभीर आरोप करत असून, या आंदोलनाबाबत पुढील काही तासांत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!