Manoj Jarange Patil : मराठ्यांना १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेऊनही मनोज जरांगे यांनी केले आंदोलन तीव्र, कारण काय..?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण देऊ केलं आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून मराठ्यांना १० टक्के आरक्षण मिळणार आहे. पण याला देखील मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोध केला आहे.
मनोज जरांगेंनी विधेयक मंजूर होऊनही सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं कारण देत उपचार घेणं थांबवलं आहे. तसेच त्यांनी पुन्हा तीव्र उपोषण सुरु केले. उद्या ते आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. उद्या मराठा समाजाने मोठ्या संख्येने बैठकीसाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं, असं आवाहन मनोज जरांगेनी केले आहे.
ते म्हणाले की, सगेसोयऱ्याच्या बाबतीत आज निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मान्य केली आहे. ज्यांना आजच्या आरक्षणाची गरज होती त्यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतला. त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही, असंच यातून दिसून येत आहे. असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange Patil
आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठा समाजामुळे मंजूर झाला आहे. असे असले तरी आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही. तरीही दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही तर मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा देखील मनोज जरांगेनी दिला आहे. आता उद्याच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.