Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे वाटोळे मराठा नेत्यांनीच केले, आता २४ डिसेंबरनंतर ‘त्या’ नेत्यांची नावे जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा..
Manoj Jarange Patil : आमच्या मराठा समाजाचे जास्त वाटोळे मराठा नेत्यांनीच केले, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर जर २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर सर्वांचीच नावे जाहीर करणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी आज जालना या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील म्हणाले की , मराठा समाजाचा सर्वात जास्त वाटोळं हे मराठा नेत्यांनीच केले. आमच्या जीवावर निवडून आले केंद्रात त्याचबरोबर राज्यामध्ये मंत्री झाले. मुख्यमंत्रीपद देखील घेतलं मात्र आम्हाला साथ दिली नाही म्हणून आमचं वाटोळ झालं. आमच्या हक्काच आरक्षण देखील त्यांनीच घालवलं. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
इतकंच नाही, तर २४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सर्वांचीच नावे जाहीर करणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. कोण कोण ओबीसींमध्ये २० वर्षांपासून आहे. आपले आरक्षण कुणी घालवले, त्यांची नावे देखील सर्वांसमोर मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर या पत्रकार परिषदेतून त्यांनी मराठा नेते त्याचबरोबर ओबीसी नेत्यांवर देखील शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या सवलती आहेत. त्या सर्व सवलती त्यांना मिळत आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील मिळाव्या अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.
ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं थेटच जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे, असं जरांगे म्हणाले.