“२८ ऑगस्टपर्यंत निर्णय नाही तर महाराष्ट्र ठप्प!” मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक रणशिंग

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीत २९ ऑगस्टपासून मोठ्या आंदोलनाची घोषणा करत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. “२८ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर २९ ऑगस्टपासून सुरू होणारा लढा हा आतापर्यंतचा सर्वात निर्णायक असेल,” असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ५८ लाख नोंदी उपलब्ध असूनही पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकऱ्या आणि भवितव्य धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

हैदराबाद गॅझेटमधील नोंदींचा आधार घेऊन पात्र मराठा नागरिकांना तत्काळ प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी करत त्यांनी समाजातील ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी तातडीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. “यावेळी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सहभागी झाले पाहिजेत. एकाही मराठ्याने घरी बसायचे नाही,” असे आवाहन त्यांनी केले.


सरकारवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला वारंवार समित्या, बैठका आणि आश्वासनांमध्ये अडकवले जात आहे. ओबीसी सवलतींसंदर्भात शासन निर्णय काढल्याचा दावा केला जातो, मात्र अनेक विभागांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना नियुक्त्या आणि शैक्षणिक लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि इतर योजनांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक तरुणांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्ज काढले, मात्र अपेक्षित मदत मिळाली नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली.
याशिवाय आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. “समाजावर अन्याय करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले.
सभेदरम्यान त्यांनी आणखी एक मोठा दावा करत २९ ऑगस्ट रोजी काही प्रभावशाली व्यक्ती आणि मंत्र्यांबाबत महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले. “मराठा समाजाला लाभ मिळू नये म्हणून काही जण प्रयत्न करत आहेत. योग्य वेळी सर्वांची नावे जनतेसमोर मांडणार,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत मराठा तरुणांच्या नियुक्त्या आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. “आम्हाला पद, सत्ता किंवा वैयक्तिक लाभ नकोत; मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
२९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी आजपासूनच गावागावांत नियोजन सुरू करण्याचे आवाहन करत त्यांनी हा लढा मराठा समाजाच्या हक्काचा आणि अस्तित्वाचा असल्याचे स्पष्ट केले. आता सरकार २८ ऑगस्टपूर्वी कोणता निर्णय घेते आणि आंदोलन टाळण्यासाठी कोणती भूमिका मांडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.