रम्मी गेम व्हिडीओ प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी घेतला मोठा निर्णय! आता रोहित पवारांचीच होणार चौकशी…

पुणे : माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडीओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंचा जबाब नोंदवल्यावर कोर्टाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
रोहित पवार यांना या प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. कोकाटे यांच्या जबाबानंतर नाशिक न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, हा व्हिडीओ कोणी काढला आणि तो कसा व्हायरल झाला, याचा तपास होणार आहे.
कोर्टाच्या आदेशामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. कारण, कोकाटेंनी थेट रोहित पवारांवर बदनामीचा दावा दाखल केला असून, पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी (पत्त्यांचा खेळ) खेळताना दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर आमदार रोहित पवारांनी कोकाटेंवर तीव्र टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांनी देखील या मागणीला पाठिंबा देत मोठा राजकीय दबाव निर्माण केला होता.
या प्रकरणामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंकडील कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी दिली होती. पण आता कोकाटेंनी उलटप्रहार करत रोहित पवारांवरच कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.
कोकाटेंनी आपल्या जबाबात म्हटलं, “माझा व्हिडीओ कोणी काढला आणि तो रोहित पवारांना कोणी दिला? हा व्हिडीओ त्यांनी व्हायरल का केला? माझी बदनामी करण्यामागचा उद्देश काय होता?” अशा अनेक प्रश्नांसह त्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली.
कोकाटेंनी असा दावा केला की, रोहित पवारांना व्हिडीओ कोणी दिला आणि त्यांनी तो जाणीवपूर्वक सार्वजनिक केला. यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसला आहे.” त्यांनी न्यायालयाकडे या संदर्भात बदनामी प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या सुनावणीनंतर कोर्टाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता या प्रकरणात रोहित पवारांना चौकशीचा सामना करावा लागू शकतो.