टीव्हीवर बातमी पाहिली अन् घरमालकाला संशय आला! जितेंद्र आव्हाडांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा पुण्यात सापडला


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन आणि संदेशाद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल माधवराव बिच्चेवाड याला पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, दूरचित्रवाणीवर आव्हाड यांना धमकी दिल्याची बातमी पाहिल्यानंतर आरोपीच्या घरमालकाला संशय आला. त्यानंतर त्याने स्वतः भाडेकरूला पोलिस ठाण्यात नेले. पुढे ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरच्या रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना दोन ते तीन वेळा फोन करून तसेच संदेश पाठवून धमकावण्यात आले होते. ‘तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी गोळ्या घालेन,’ अशा स्वरूपाचे धमकीचे शब्द वापरल्याचा आरोप आहे. फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आव्हाड यांनीही समाजमाध्यमांवर या प्रकाराची माहिती दिली होती. संबंधित व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि आपण त्यांच्या घराच्या दरवाजाजवळ उभे असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला होता. ही धमकी केवळ आव्हाड यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांनाही गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाणी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.

घरमालकानेच आरोपीला पोलिसांपर्यंत पोहोचवले

विशाल बिच्चेवाड हा पुण्यात भाड्याच्या घरात राहत होता आणि सुरक्षारक्षक पर्यवेक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दूरचित्रवाणीवर जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याची बातमी पाहिल्यानंतर घरमालकाला आपल्या भाडेकरूबाबत संशय आला. त्याने तातडीने विशालला पकडून लोणीकंद पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ठाणे पोलिस तेथे दाखल झाले.

पुढील कारवाई ठाणे पोलिसांकडून

लोणीकंद पोलिसांनी विशाल बिच्चेवाड याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाणे पोलिसांनी त्याला नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात धमकी देण्यासाठी वापरलेला दूरध्वनी क्रमांक, संदेश आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे. आमदारासह त्यांच्या कार्यकर्त्यालाही धमकी दिल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, धमकीमागील नेमके कारण काय, आरोपीने हे कृत्य कोणत्या हेतूने केले आणि प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!