शिरूरमधील तिघांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार, वनविभागाची कारवाई…

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. पिंपरखेड परिसरात दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेला आपला बळी बनवणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.

आता अखेर शार्प शूटरच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. त्यामुळे शिरूर, पिंपरखेड परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्याने काही दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. त्यांच्याकडून नरभक्षक बिबट्याला जागीच ठार मारण्याची मागणी केली होती.
बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीची घेतली दखल घेत शिरूर तालुक्यातील दोन बालकांसह तिघांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश अखेर वनविभाकडून देण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी पिंपरखेळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या शिवन्या बोंबेचा मृत्यू झाला होता. २२ ऑक्टोबर रोजी भागाबाई रंगनाथ जाधव (वय ७०, मौजे जांबुत, ता. शिरूर) या वृद्ध महिलेचा याच बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यानंतर शनिवारी (दि. १) रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले होते. सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत जाळपोळदेखील केली होती. अखेर त्या बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे.