डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणात मोठा निकाल! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातीस डोंगराळे येथील ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सून्न पडला होता. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

मात्र, या प्रकरणी मालेगाव सेशन कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत पीडितेच्या नातेवाईकांना न्याय दिला आहे. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज निकाल लागला आहे. कोर्टाने अल्पवयीन मुलीचे लचके तोडून तिला संपवणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
विजय खैरनार असं फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं होतं.


यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला ‘दादा’ म्हणायची. मात्र त्याने ‘दादा’ नावालाच कलंक फासला आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. हे प्रकरण जलद गती कोर्टात चालवून आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली होती. यानंतर आता अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच २२५ पानांचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एकूण २४ साक्षीदार तपासले. यात एका प्रत्यक्षदर्शी महिलेची आणि सात वर्षाच्या अन्य एका मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. याशिवाय पीडित कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
या सगळ्या प्रकरणात फिर्यादीच्या वकीलांनी सुरुवातीपासूनच आरोपींला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. आरोपीच्या वयाचा विचार न करता त्याने केलेल्या कृत्याचा विचार न्यायालयाने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यानुसारच हा निकाल लागला आहे.
