कर्जमाफी योजनेत मोठा ट्विस्ट! ‘या’ शेतकऱ्यांना बसला धक्का; लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का?

मुंबई : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेच्या छाननीदरम्यान प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरणारे तब्बल 94 हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.
दुसरीकडे, पात्र ठरलेल्या 16 लाख 94 हजार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी सुमारे 7 हजार कोटी रुपये थेट डीबीटी (DBT) द्वारे जमा करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आली होती. 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजना लागू करण्यात आली आहे.


पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी इन्कम टॅक्स विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. या छाननीत 94 हजार प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून, आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या मंगळवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.